शब्दांकन: श्री. गणेश देशपांडे
सहकार्य: सौ. सुप्रिया संत, सौ. स्वाती पुराणिक, सौ. सोनल देशपांडे, सौ. प्राची मोझर, श्री. संदीप मोझर,श्री. श्रीकांत पुराणिक.
विशेष आभार: पद्मश्री सन्मानित डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे
दिनांक: ०८ ऑक्टोबर २०२२
ब्रिम्म सदस्यांना काल पद्मश्री सन्मानित दाम्पत्यांना भेटण्याचा बहुमान प्राप्त झाला. त्यांच्यासोबतचा प्रत्येक क्षण हा सुखद होताच परंतु वैचारिक पातळीवर प्रत्येकाला वेगळ्याच विश्वात नेणारा होता. शरीराने जरी आम्ही सर्व ब्रिस्बेन मध्ये होतो, तरीही त्यांच्या प्रत्येक शब्दातून आम्ही मेळघाटची भ्रमंती करून आलो.
डॉक्टर दाम्पत्य हे अतिशय साधे आणि प्रथम भेटीतच त्यांच्या या साधेपणाची श्रीमंती जाणवते. अत्यंत मार्दवी भाषा, समोरच्या व्यक्तीबद्दल आदर आणि काळजी अशी कि एखादी नवीन व्यक्ती सुद्धा असाच विचार करेल की मी माझ्या घरातील वडीलधारी/काळजीवाहू व्यक्तीशीच बोलत आहे.
त्यांचे समाजकार्य अत्यंत थोर आणि त्याची प्रचिती त्यांनी आम्हाला सांगितलेल्या त्यांच्या काही अनुभवातून आली. त्यांच्या समाजकार्याचा मूळ गाभा म्हणजे, गरजू व्यक्तीला भाकरी दिली तर एकवेळचे पोट भरेल, परंतु त्याच व्यक्तीला जर भाकरी बनवायला शिकवले तर ते कौशल्य त्याची कायमची भूक भागवू शकेल.
आधी केले आणि मग सांगितले या उक्तीप्रमाणे त्यांनी समाजप्रबोधन केले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, डॉ. स्मिता या स्वतः त्यांच्या शेतातील भाजी डोक्यावर टोपली घेऊन विकायला जायच्या आणि डॉ. रवींद्र यांनी स्थानिक शाळेमध्ये तेथील लोकांना नोकरी मिळणेबाबत केलेले प्रयत्न. यामुळे स्थानिकांना केवळ अर्थार्जनाची शिकवणुकच नाही मिळाली तर त्यांना इतर सर्व सामाजिक कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली.
त्यांच्या प्रयत्नांमुळे शाळेतील मिड-डे मिल आणि अंत्योदय योजना प्रत्यक्षात उतरण्यात खूप मदत झाली.
३०-३५ वर्षांपूर्वी जेव्हा रस्ते नव्हते तेव्हा ते तेवढीच पायपीट करायचे. तेथील स्थानिकांना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळावा आणि सोबत त्यांच्या जीवनमानात गुणात्मक फरक व्हावा यासाठी. हे सर्व करत असताना त्यांनी नैसर्गिक आणि वन्य साधनसंपत्तीचा विकास याचाही सुरेख मेळ घातला.
हे सर्व करत असताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. काही समस्या शैक्षणिक, आर्थिक, वैचारिक होत्या तर काही नैसर्गिक आणि मानवनिर्मित. परंतु या सर्वांचा त्यांनी अत्यंत सक्षमपणे केवळ सामनाच केला नाही तर त्यात ते खरे उतरले.
भारत सरकारने डॉक्टर दाम्पत्याचा वैद्यकीय कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला आहे.
आज मेळघाटात रस्ते, मोबाईल, शाळा, कॉलेज आणि इतर सुविधा उपलब्ध आहेत आणि दिवसागणिक त्यात अधिक भर पडत आहे. हे सर्व तांत्रिक आणि सामाजिक बदल घडत असताना त्यांनी पुढील पिढी आणखी कसे चांगले करू शकेल यावर आता भर दिला आहे.
हे सर्व त्यांच्याबद्दल, पण आज आम्ही काय शिकलो?
प्राप्त परिस्थिती अथवा अडचणींबद्दल तक्रार करू नका तर त्याच्याशी समरूप व्हा आणि सकारात्मक विचार करा.
प्रत्येक दिवशी थोडा तरी वेळ नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा.
गरजेपेक्षा जास्त अपेक्षा ठेऊ नका आणि विनाकारण भौतिक जगात आपला टेंम्भा मिरवण्याचा अट्टाहास नको.
जरी आपण आज भारताबाहेर आहोत तरीही आपण आपली मातृभाषा आणि मातृभूमी यांचे ऋण इथे राहूनही फेडू शकण्याचा निश्चित प्रयत्न करू शकतो.
आपण समाजाप्रति काहीतरी देणे लागतो आणि थोडातरी वेळ समाजसेवेसाठी द्यावा. आपल्या मुलांमध्ये हा विचार रुजवण्याचा प्रयत्न करावा.
आपले आणि आपल्या पुढील पिढीमध्ये अंतर वाढत आहे की कमी होत आहे? पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये आपली मुले वाढत आहेत आणि त्यांना आपण आपली संस्कृती समजवून सांगून सामावून घेण्याचा प्रयत्न करावा.
जेव्हा भेटीअंती आम्ही सर्व निघालो तेव्हा आम्ही सर्वांनी त्यांना, अगदी कार पार्कमध्ये, जोडीने वाकून नमस्कार केला.
श्रेष्टास नमस्कार हि जरी आपली संस्कृती असली तरी कालचा नमस्कार हा शब्दसंस्काराबाहेरचा होता हे नक्की.
पाय निघत नव्हता आणि प्रत्येकाच्या डोळ्यातील भाव हेच सांगत होते – अजि मी ब्रह्म पाहिले.