SwarSandhya – गोष्ट एका कार्यक्रमाची

गोष्ट एका कार्यक्रमाची

ऋता बागुल

१ मार्चला BRIMM तर्फे ‘स्वर संध्या’ हा मराठी गाण्याचा कार्यक्रम झाला आणि तो अतिशय देखणा आणि दर्जेदार झाला.

BRIMM ने जवळजवळ ४ महिन्यांपूर्वी आपल्या सर्व सदस्यांना आवाहन केले होते की ज्यांना गायन, वादन, सादरीकरण अशा कोणत्याही प्रकारात भाग घ्यायचा असेल, त्यांनी नावे द्यावीत.

यानुसार समोर आलेल्या कलाकारांसह शिरीष बागुल यांनी या कार्यक्रमाची मुहूर्त मेढ रोवली. आलेल्या या कलाकारांमध्ये काही प्रथित यश  होते, काही थोडासा सराव असलेले होते तर काही असेही कलाकार होते की ज्यांनी कधीही जाहीर कार्यक्रमात भाग घेतला नव्हता.

या प्रत्येकाची देवदत्त कला, त्यांचा आवाज, गळ्यातून येऊ शकणारी फिरत , त्याचबरोबर त्यांच्या आवाजातून कोणत्या प्रकारचे भाव व्यक्त होऊ शकतील याचा विचार करून गाणी निवडली गेली. यात सेमी-क्लासिकल नाट्यसंगीत, भक्तिगीत, भावगीत, लोकगीत, सिने  संगीत असे विविध गायन प्रकार निवडले गेले.

आणि मग सुरू झाली तीन महिन्यांची सक्त तालीम. एकेक शब्द, एकेक सूर, एकेक ताल, एकेक भाव, घटवून आणि घडवून घेत  हा प्रवास सुरू झाला. शिरीष व शरद हे सतत प्रयत्न करीत होते की प्रत्येक गाण्याला आपण कसा उठाव आणू शकतो, कारण जाहीर कार्यक्रमातील कला ही Art आणि Kraft दोन्ही लागतं.

भाग घेतलेल्या कलाकारांनी अथक परिश्रम केले. दिलेल्या मार्गदर्शनाचा पुरेपूर विचार करून ते आचरणात आणले. कधी हिरमुसले, कधी स्वतःवर नाराज झाले तरी पुन्हा जिद्दीने पुढच्या प्रयत्नाला लागले.

काही जणांची छोटी मुलं, काही जणांच्याकडे वाहन नाही, काही जणांची घरे दूर, याशिवाय सर्वांच्या पूर्ण वेळाच्या नोकऱ्या. तरीही कधीही अडचणींचा बाऊ न करता प्रत्येक तालीमेला वेळेवर हजर राहिले. म्हणतात ना, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवत्व मिळत नाही. तसंच आहे हे.

या सर्व कष्टांची फलश्रुती १ मार्चच्या कार्यक्रमात झाली. प्रत्येक कलाकार अगदी झटून  स्वतःचा आणि संपूर्ण कार्यक्रम उंचावण्याचा प्रयत्न करत होता, तो सफल ठरला.

संगीत कार्यक्रम अत्यंत देखणा, नेटका आणि बांधिव स्वरूपात सादर झाला. वेळेवर सुरू झाला. कुठेही गडबड नाही. अनेक गाण्यांना कोरस होता, ते कलाकार अगदी नेमक्या वेळी हजर होत होते. गायक कलाकारांच पूरक वाद्य वाजवीत होते.

संपदाने  सर्व क्लासिकल रचना अतिशय उत्तम सादर केल्या आणि त्याच बरोबर लोक गीतही निशीगंधा बरोबर गाजवलं.

निशिगंधा आणि रश्मी यांनी भावगीत ते लावणी अशी पूर्ण range ताकदिने दाखवली.

अश्विनीने लडिवाळ नाजूक प्रेमगीत, आणि ठसक्यात लावणी सादर केली.

सुहासने घन घन माला हे बहारदार गीत पेश केले तर विलासच्या भक्ती गीतांनी श्रोत्यांना भारावून टाकले.

मकरंदने ‘मनाच्या धुंदीत’ गाऊन वातावरण धुंद केले .

श्रोत्यांनी वाजवलेल्या टाळ्यांनी, दाद देत कार्यक्रम रंगत गेला.

तसेच आपल्याला  दोन नव्या गायिका मिळाल्या. पलविंदरने पहिल्याच प्रयत्नात, ‘केव्हा तरी पहाटे’ सारख्या कठीण गाण्याचं आव्हान सहज पेललं .  आदित्यने बासरीच्या सुरांनी नवी ‘वादळवाट’ चोखाळली.

पण आपल्या सर्वांचे जिने मन जिंकून घेतले ती ६ वर्षांची छोटी रमा. खणखणीत आवाज, स्पष्ट उच्चार, गाण्यांची समज याने  प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.

कालचा वाद्यवृंद अप्रतिम होता. शरदची सिंथेसायझर, विजेंद्रजींची गिटार, अजिंक्यच  ऑक्टोपॅड, आणि अश्विनीने स्वतः शिकून हार्मोनियमवर वाजवलेली गाणी आणि तबल्यावर शिरीषची साथ — हा नजराणा प्रेक्षकांना खूप भावला.

शरदाजीनी  किती प्रकारचे छोटे छोटे कलात्मक pieces बसवून गाणी नटवली याला तोड नाही. शिरीषने गाण्याला उठाव येण्यासाठी वापरलेले वेगवेगळे ताल, ठेके, आणि लग्गी यामुळे गाणी रंगत गेली.

हा सर्व कार्यक्रम visually उत्तम व्हावा यासाठी आणि सर्व कलाकारांचे आवाज आणि भाव प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे यासाठी महेशने जी मेहनत होती ती अत्यंत कौतुकास्पद आहे. त्याने लहान मुलांनाही  सहभागी करून खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचबरोबर सूत्रसंचालनही उत्तम केले.

BRIMM चे अध्यक्ष गणेशजी आणि सचिव आदित्य यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आपण हा कार्यक्रम QMC सारख्या उत्तम हॉलमध्ये पाहू शकलो. मंडळाबरोबर अनेक स्वयंसेवकांचा हातभार यात लागला आणि हा एक अत्यंत देखणा आणि स्वरबद्ध कार्यक्रम आपण पाहू शकलो.

या स्वर तालांची जादू पुढे कित्येक वर्षे आपल्या मनावर राहील याची मला खात्री आहे.

प्रेक्षक आणि स्वयंसेवक,  ऋता बागुल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *