स्वरसंध्या – माझ्या मनातलं काही
रश्मी जोगळेकर
स्वरसंध्येबद्दल बोलायला लागले की शब्दच थांबत नाहीत… जणू काही आपण सगळे अजूनही त्या मैफिलीत बसलो आहोत आणि गप्पांच्या ओघात प्रत्येक क्षण पुन्हा अनुभवतो आहोत. अनेक वर्षांनी गाण्याबद्दल इतक्या मनापासून बोलण्याची संधी मिळाली — म्हणूनच हे मन मोकळं करावंसं वाटतं आहे.
सर्वप्रथम, माझ्या संगीतप्रवासामागे उभे असलेले माझे वडील कै. अरविंद गजानन देशमुख यांचा उल्लेख केल्याशिवाय हे लेखन पूर्ण होऊ शकत नाही. लहानपणी ते मला संवादिका (हार्मोनियम) वर नियमित रियाज करून घ्यायचे. सूर चुकले की पुन्हा पुन्हा म्हणायला लावायचे. “गाणं नीट बसलं पाहिजे” ही त्यांची भूमिका ठाम होती. त्या शिस्तीतून, त्या प्रेमळ कठोरतेतून माझ्या गाण्याचा पाया घातला गेला. आज मी जे काही गाते, त्यामागे त्यांचा आशीर्वाद आहे, ही माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे. आणि घरात वातावरण म्हणजे सकाळी आजोबांबरोबर काकड आरती सुरात म्हणायचे.
माझ्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या शिक्षणात मला पंडित अरुण कशाळकर (मुलुंड पूर्व) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सौ. निलिमा ताई पुराणिक यांच्याकडूनही मी तालीम घेतली. भावसंगीतासाठी सौ. रंजना ताई जोगळेकर यांच्याकडून शिकताना “कविता कशी वाचायची, तिचा अर्थ कसा समजून घ्यायचा आणि त्या शब्दांमध्ये भाव कसा ओतायचा” हे अमूल्य शिक्षण मिळालं. गाणं म्हणजे केवळ सूरांची मांडणी नसते, तर शब्दांतील भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची एक जबाबदारी असते — ही जाणीव त्यांनी दिली.
स्वरसंध्या या कार्यक्रमाबद्दल मला खूप काही बोलायचं आहे… खरं तर थांबवतच नाहीये स्वतःला. जणू काही आपण सगळे गप्पा मारतोय आणि त्या गप्पांमध्ये प्रत्येक क्षण पुन्हा जगतेय असं वाटतंय. शिकणं कधीच थांबवायचं नाही, हे मी स्वतःला नेहमी सांगते — आणि या कार्यक्रमाने ते पुन्हा एकदा जाणवून दिलं.
प्रत्येक कलाकाराकडून काहीतरी शिकायला मिळालं.
संपदा ज्या पद्धतीने आलापी आणि तान सुरू करते, ती नेमकी आणि भावपूर्ण सुरुवात…
अश्विनीची हर्कत घेण्याची शैली…
निशीने “फुलले रे” मध्ये दाखवलेले वेगवेगळे मींडचे सुंदर variations…
पल्लूचा शांत, सहज आणि संयत आवाज…
सुहासची झांज वाजवताना तालावर असलेली अचूक पकड…
विलास दादा आणि मकरंद दादा यांची ताल-बीटची अप्रतिम जाण…
रमाचा संगीत संपल्यानंतर आत्मविश्वासाने गाणं उचलण्याचा अंदाज…
सरिताने कोरसला दिलेली भक्कम साथ…
खरंच, इतकं शिकायला मिळालं की अनेक वर्षांनी गाण्याबद्दल इतक्या मनापासून बोलण्याची संधी मिळाली — म्हणूनच कदाचित मी थांबत नाहीये!
शिरीष दादा प्रत्येक वेळी माझ्यासाठी ताल जुळवून घेत होते, आणि शरद दादा कोणत्याही स्केलमध्ये, कोणत्याही नोटमध्ये इतक्या सहजपणे साथ देत होते — संगीताचा एक सुंदर संगम घडवत. विजेन दादा आणि अजिंक्य यांनी त्यांच्या सादरीकरणातून गाण्यांना एक वेगळाच फ्लेवर दिला. आणि आदित्य — काही गाण्यांमध्ये बासरीचे pieces नक्की वाजव, अशी माझी मनापासून इच्छा आहे!
शिरीष दादा म्हणाले तसे — आपल्याला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. माझ्या पहिल्या गाण्यावेळी मी थोडी थरथरत होते, थंडीमुळे आवाजही थोडा कापत होता. रुताने गाडीत जाऊन माझ्यासाठी शाल आणली — धन्यवाद रुताताई! ज्या गाण्यावर मला खूप आत्मविश्वास होता, ते माझ्या अपेक्षेप्रमाणे सादर झालं नाही, हेही मी मनापासून मान्य करते. अजून खूप काम करायचं आहे — माझ्या एकूण सादरीकरणावर, माझ्या तयारीवर.
अमलाने पॉवरपॉईंट स्लाईड्सबद्दल खास विचारपूस केली. मी महेशचं नाव सांगितल्यावर तिने सांगितलं — “त्याला नक्की कळव, ते magnificent होतं!” हे ऐकून खूप आनंद झाला. पुढची प्रॅक्टिस असेल तर मी नक्की तयार आहे!
“गणपती बाप्पा मोरया!” 🙏🏽
मी वर सगळ्यांच्या ताकदींबद्दल लिहिलंय… पण माझी ताकद म्हणजे तुम्ही सगळे. खरंच, माझ्या बाबांचा आशीर्वाद आहे म्हणून ही सगळी किमया घडतेय असं मला वाटतं. २०१२-१४ च्या सुमारास मी गाणं जवळजवळ सोडलं होतं. लहानपणापासून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या गुरूंसोबत कार्यक्रम करत होते, पण काही काळ थांबले. आता मात्र मी ‘स्वानंदासाठी’ गाते — एक गाणं असेल तर एक, दोन असतील तर दोन — पण मनापासून.
शिरीष दादा आणि शरद दादा यांनी पुन्हा संधी दिली, यासाठी मी त्यांची अत्यंत आभारी आहे. आणि अर्थातच महेशचा खूप मोठा पाठिंबा आहे. स्त्रीला तिच्या कुटुंबाचा — नवरा आणि मुलांचा — आधार नसेल तर ती काहीच करू शकत नाही, हे मला प्रकर्षाने जाणवतं. सान्वीला संगीताची आवड आहे, ती मला “गाणं गा, गाणं गा” म्हणते, कधी कधी तिच्या वेस्टर्न सिंगिंगच्या ज्ञानातून मला टिप्सही देते — हे सगळं माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे.
अश्विनीने माझ्या घरी येऊन खास प्रॅक्टिस घेतली — त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
शिरीष दादा आणि शरद दादा — एवढंच सांगते की तुमच्यासारखे perfectionist नसते तर माझं गाणं एवढं सुधारलं नसतं.
ही आपल्या सगळ्यांची भेट — संगीतासाठी, संस्कृतीसाठी, आपल्या माणसांसाठी — इथेच थांबू नये. ती अशीच वाढत राहो, फुलत राहो आणि आपल्या या ग्रुपची उत्तरोत्तर प्रगती होवो, हीच परमेश्वराकडे प्रार्थना.
इतकंच म्हणत माझं हे ‘भाषण’ संपवते 🎶🙏🏽
