गणपती, कालचा, आजचा आणि पुढचा!
माझे आजोळ कोकणातले, त्यामुळे बालपणीच्या कोकण फिरस्तीच्या आठवणींत गणपतीला एक खास स्थान आहे. आम्ही आठवडाभर आधी मुंबई होऊन त्या वेळच्या लाल डब्याच्या बसमधून घाटातला वळणावळणाचा प्रवास कसाबसा सहन करून गावात पोहोचायचो. तिथे सगळी भावंडं गोळा झालेली असायची. मग, गणपतींची तयारी सुरु व्हायची ती घर साफसफाईपासून. आत्या अंगण, पडवी आणि तुळशी वृंदावन शेणाने लखलखीत सारवायची. आम्ही मुंबईकर पोरे मात्र हा प्रकार थोडीशी नाके मुरडत दुरूनच पाहायचो. बाबा आणि काका मंडळी मग आराशीसाठी भिंतीवर चित्र काढायचे, एखादा रामायण, महाभारत किंवा दशवतारातला प्रसंग सफाईने रंगवायचे. मग वर माडी घालून त्याला पोफळी, आंब्याचे डहाळे, भाताच्या लोम्ब्या लावायचे. समोर दारात फुललेल्या जास्वंदीचे हार आणि जागोजागी उगवलेला तेरड्याच्या डहाळ्यांनी साधी सुरेख सजावट करायची. पहाटे उठून चाललेली लगबग, त्यातच पोरांचा धुमाकूळ डोळ्यासमोर उभा राहतो. आम्ही टाळ वाजवत गणपतीबाप्पाला घरी आणायचो. आई किंवा आजी गणपतीला ओवाळून स्वागत करायच्या. मखरात बसलेला गणपती बाप्पा अगदी देखणा दिसायचा. पूजा–अभिषेकाच्या वेळेला मात्र आम्ही पोरे पसार होऊन परतायचो सरळ आरतीला. माझे आजोबा खरे वर्षभर नास्तिकच वागायचे पण घरी आलेल्या गणपतीला जास्वंद खुडून वाहायचा नेम मात्र चुकला नाही. आजूबाजूचे शेजारी गोळा होऊन तासभर लांब आरत्या म्हणायचो. एक डोळा प्रसादावर! गणपतीच्या जेवणाची लज्जतच न्यारी होती. नेहमीची भाजीही किती चविष्ट लागायची! उकडीचे मोदक खायची मग स्पर्धा व्हायची. संध्याकाळी भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठरलेला असायचा. अश्या लगबगीत गणपतीचे दीड दिवस फुलपाखरासारखे भुर्र्कन उडून जायचे.
आज मुंबई सुटली आणि ऑस्ट्रेलियात स्थायिक झालोय. गणपतींच्या दिवसात मन परत गावी जातं. इथेही आपली मराठी मंडळी आवर्जून गणेशोत्सव साजरा करतात. कौतुकाने घरी गणपती बसवतात. मराठी मंडळ सर्वांसाठी गणपतीची पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. जे हरवले ते परत गवसले असे मग वाटू लागते. घरच्या घरी आम्ही इथली शाडूची माती म्हणजे clay ने गणपतीची छोटीशी मूर्ती मुलांबरोबर बनवतो. बागेतल्या गुलाबाला किंवा जास्वंदीला आलेले एखादे फूल, lawn मधल्या गवतातून वेचून आणलेल्या दुर्वा आणि माव्याचे मोदक अशी मग जय्यत तयारी होते. आरास दरवर्षी वेगळी, कधी कमळातला गणपती तर कधी झुल्यावरचा! हल्ली मुलांच्या कल्पक डोक्यातून सुपीक कल्पना येतात आणि मग आमचा गणपती “इंडिया“ला जाणाऱ्या विमानावर वर बसतो!!
कधी जाणवते, आपली पुढची पिढी अधिक चौकस आहे. पुराणातल्या गोष्टी ऐकून घेतील पण त्यामागची कारणेही विचारतील. शंकराने गणपतीचे धड रागाच्या भरात छाटून टाकले ही गोष्ट ऐकल्यावर मला माझा मुलगा विचारतो, पण बाबाला एवढा का राग आला की त्याने डोकेच उडवले? दुसरी शिक्षा का नाही दिली? विचारात पाडणारे प्रश्न आहेत. तर दुसरीकडे, मुलीचा बाप्पाला लाल फूल नाहीये, पिवळे चालेल का ह्यातला निरागसपणा ही तेवढाच आहे. मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी फार वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. असेच आपले छोटे मोठे सण घरी आपल्याला जमतील तितपत साजरे करायचे. सगळंच शास्त्रशुद्ध पद्धतीने झाले पाहिजे असा फारसा अट्टाहास नाही करायचा. मुलांना मोठे झाल्यावर हे सण साजरे करताना आनंद अपेक्षित आहे, आपले काही चुकले तर अशी भीती नाही. मग त्यांना हा एलिफन्ट गॉड आपलाच लाडका गणपती बाप्पा वाटेल. अर्थात आपल्या मातीशी आणि मुळांशी किती जवळीक साधायची हा निर्णय त्यांचा, आपण आपल्याला मिळालेला वारसा पुढच्या पिढीला द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करायचा.
प्राजक्ता सत्येन कुलकर्णी
Very nice write up 👍🏼
Very nice blog, thank you from BRIMM.