माझ्या आठवणीतला गणेश उत्सव ….
मराठी माणूस आणि ‘गणेश उत्सव’ एक वेगळेच समीकरण आहे. सार्वजनिक गणेश उत्सव, वैयक्तिक गणेश पूजन, कोकणात होणारा माघी गणेश उत्सव, घरोघरी बसणारे गौरी-गणेश अशा सगळ्याच प्रकारच्या सोहळ्यात मराठी माणूस सहभागी हॊतॊ. संस्कृत गणेश हे नाव ‘गण’आणि ‘ईश’, म्हणजे ‘गणाचा स्वामी किंवा गुरु’, ह्यामध्ये ‘गण’ म्हणजे शिवअवतार-गण असाही अर्थ काही ठिकाणी प्रचलित आहे. प्रत्येक गोष्टीची सुरवात ‘श्रीगणेशा’ म्हणून करणारे मराठी मन, प्रत्येक गोष्ट करताना आपल्या आराध्य देवतेचे स्मरण- पूजन करणारच. गणपती, हे हिंदू मंदिरातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक पूजल्या जाणार्या देवतांपैकी एक असे आराध्य दैवत आहे, खूप प्रेमाचे अगदी जवळचे. महाराष्ट्रातली अष्टविनायक रूपें आणि भारतात दक्षिणेकडे दिसणारा गणेशा, ते भारताबाहेर नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, फिजी, सिंगापूर, मलेशिया, फिलीपिन्स आणि बांग्लादेश ह्या भारतीय लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये भारतीय परंपरेने विराजित झालेला बाप्पा विलॊभनीयच दिसतो. गणेशाची भक्ती हिंदूंसह जैन आणि बौद्ध धर्मामध्ये मोठ्या प्रमाणावर होते. ऑस्ट्रेलिया मध्ये १४ वर्षांपूर्वी, टाऊनस्वीलला जेव्हा आलो, तेव्हा भारतीय समूहाच्या मदतीने गणेशऊत्सव साजरा करायचे ठरले. टाऊनस्वीलमध्ये त्यावेळी भारतातल्या प्रत्येक प्रांतातील जेमतेम ४-८ कुटुंबे होती.
गणेशऊत्सव साजरा करायचे ठरले खरे, पण प्रश्न आला गणेशमूर्तीचा. तो पर्यंत इकडे भारतीय-किराणा दुकानांमध्ये गणेशाचे आगमन झालेले नव्हते, किमान टाऊनस्वीलमध्ये तरी! मूर्ती मिळत नसल्याने, मूर्ती बनवण्याचे ठरले. आणि रॉस नदीत विसर्जित करता येईल अशा साठी योग्य माती कुठे मिळेल ह्याचे प्रयत्न सुरु झाले. या गणेशाची कितीतरी गोड रूपं आपल्याला माहित आहेत, भक्ताला ज्या रूपात हवे त्या रूपात हे दैवत त्याला साथ देते. मूर्तीसाठी माती मिळाली तशी बालगोपाळांसह पालकमंडळी मूर्ती बनवण्यासाठीच्या उपक्रमात सहभागी झाली. गणेश-चतुर्थी आधीचा एक रविवार बघून मूर्ती बनवण्यासाठीची तयारी सुरु झाली. दोन-तीन जणांनी मिळून एक आराखडा तयार केला, कुठलाही साचा न-वापरता फक्त हाताने मूर्ती घडवणे हे एक कसबंच, त्यात कुणी म्हणावे तसे पारंगत पण नाही, असे असतानाही उत्साहाची कमतरता नव्हती, आणि हा उत्सव व्हावा, ही मुळात त्या ‘विघ्नहर्त्यांची’ इच्छा त्यामुळे ज्याला जशी जमेल-आवडेल तशा वेगवेगळ्या आकाराच्या, स्वरूपाच्या गणेशमूर्त्या आकार घेऊ लागल्या. मग योग्य रंगांचे वापर करून छानसे नेटके नाक, डोळे, कान, मुकूट आणि अलंकार-विभूषणे ह्याने ती सजली सुद्धा. मुद्गल पुराणात वर्णन केलेल्या गणेशाच्या आठ अवतारांपैकी, गणेशाने पाच अवतारात उंदीर वाहन म्हणून वापरला आहे. शिवाय, रूढार्थाने मूषक किंवा उंदीर हे गणेशाचे वाहन ह्या गणेशउत्सवाच्या त्याच्या रूपात सगळीकडे दिसते, त्यामुळे प्रत्येक मूर्तीसोबत मूषकराज सुद्धा विराजमान झाले.
गणपती उत्सव करायचे ठरले, तसे कोणी मंडप, सजावट, प्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम ह्याची जवाबदारी घेतली. गणपतीचे दहा दिवस एकदम मंतरलेले. दिवसभर प्रत्येकजण काम-धाम उरकून, संध्याकाळी छानसे नटून-थटून येणार. एक दिवस एका प्रांताचा, त्यामुळे पूजा-अर्चा, आरती, नैवेद्य सगळे त्या-त्या प्रांताच्या रितीभातीनुसार. त्यामुळे, प्रसादाचा मेनू ते पारंपरिक वेशभूषा सगळीच धमाल. प्राण-प्रतिष्ठेच्या दिवशी, आभूषणे चढवताना, आरास मांडताना बहुतेक सगळ्यांना भरून आलेले दिसले. मायभूमीपासून दूर-तरीही मायदेशाशी जोडणारी एक परंपरा जोपासण्यात खारीचा का होईना पण प्रत्येकाचा वाटा होताच. कधी भजनं, कधी गरबा, कधी स्तोत्र अशामध्ये कोणाचा पाय लवकर निघायचा नाही.
अनंत-चथुर्दशी आली, तशी सकाळपासून गडबड-लगबग चालू झाली, अनायसे त्या दिवशी रविवार होता. मग सकाळी अथर्वशीर्ष पठण, विघ्नेश्वर अष्टोत्तर शतनाम स्तोत्र, श्री महागणेश कवचं; नंतर आरत्या, नैवेद्य-प्रसाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या नाद-घोषात विसर्जन मिरवणूक, असा भरगच्च कार्यक्रम. विसर्जन मिरवणुकीला खरोखरीच भरून आले; रॉस नदीत विसर्जन करून घरी आलो ते एकदम रितेपण आले. गणपतीसोबतचे दहा दिवस मंतरलेले होतेच, पण सगळ्यांच्या सहभागाने त्याचे सुंदर सोहळ्यात रूपांतर झालेले होते.
सुरेख वर्णन केलंय.मी इथे माझ्या मुला कडे आले आहे . मंडळाच्या गणपती उत्सवा बद्दल सतत सुचना येत असल्याने फार छान वाटतंय.याकरता मंडळ व या सुंदर ब्लॉग करता धन्यवाद देते
सुरेख वर्णन केलंय.मी इथे माझ्या मुला कडे आले आहे . मंडळाच्या गणपती उत्सवा बद्दल सतत सुचना येत असल्याने फार छान वाटतंय.याकरता मंडळ व या सुंदर ब्लॉग करता धन्यवाद देते
Beautifully described motivational and thanks to blog writer and brimm
Very nice blog, Thank you from BRIMM